बदलापूर चिमुकलीवरअत्याचार प्रकरण : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नाही ? काय आहे न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल
मुंबईच्या बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र खवळून उठला होता. या प्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे नावाच्या तरुणाला अटक केली होती. शाळेतल्या चिमुकल्यांवर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येनं लोकांनी एकत्र येत, रेल रोको केला होता. नागरिकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली होती.बदलापूर प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असताना पोलिसांनी अक्षय शिंदेचं एन्काऊंटर केलं होतं. अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांची स्वसंरक्षणार्थ गोळीबाराची भूमिका संशयास्पद असल्याचे निरीक्षण न्यायालयीन चौकशी समितीने नोंदवले आहेत.
अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचे सांगत गुन्हा दाखल करून कारवाई करा, असे न्यायालयीने चौकशी समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्वसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या, हा पोलिसांचा युक्तीवाद संशयास्पद असल्याचे सांगत अक्षयवर केलेला गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
एन्काउंटरनंतर पोलिसांनी काय सांगितले होते?
दरम्यान, आरोपी अक्षयला चौकशीसाठी जेलमधून घेऊन जात असताना अक्षयने जीपमधील पोलिसाच्या कंबरेवरील बंदूक हिसकावून तीन राऊंड फायर केल्याचे पोलिसांनी त्यावेळी सांगितले. दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रत्युरादाखल अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. गोळीबारानंतर अक्षयला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्याचे पोलिसांनी त्यावेळी सांगितले.