बीड प्रकरण ! वाल्मिक कराडवर हत्या केल्याचा गुन्हा दाखल होणार?
मस्साजोच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणात वाल्मिक कराड याला सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आता या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आणखीच घट्ट झाला आहे. आता त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकतो. वाल्मिक कराडला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याआधीच मोठी बातमी समोर आली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून सुरू आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल, कॉल डिटेल्स महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह 2 कोटी रुपयांची खंडणी, मारहाण आणि अॅट्रॉसिटी या गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. हत्या प्रकरणात 7 आरोपी अटकेत आहेत. तर, कृष्णा आंधळे हा आरोपी 9 डिसेंबर 2024 पासून फरार आहे. त्याच्या शोधासाठी सीआयडीने विविध पथके तयार केली असून शेजारच्या राज्यातही शोध सुरू आहे. सीआयडीला संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित गुन्ह्यांतील एकही आरोपी पकडण्यात यश आलेले नाही.
मस्साजोगचे सरपंच दिवगंत संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुरवणी जबाबात वाल्मिक कराड याचे नाव समोर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी यांच्या जबाबात वाल्मिक कराड यांनी फोनवरून धमकी दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांना एक महिन्यापासून धमकी मिळत असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे देशमुख कुटुंबियांनी वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर वाल्मिक कराडविरोधात हत्या केल्याचा गुन्हा दाखल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.