‘उमेद’तर्फे आठवडी रानभाज्या महोत्सव; पंचायत समिती नाशिकच्या आवारात रानभाज्यांची विक्री
नाशिक : पंचायत समिती आवारात नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने रविवार दि.१५ रोजी आदिवासी भागातील बचत गटांमार्फत आठवडी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी दिनाच्या निमित्ताने कृषी विभागाच्या वतीने कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते यावेळी शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशाने मागील वर्षी कृषी विभाग व उमेद यांच्या वतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तसेच याही वर्षी प्रत्येक आठवड्यात रानभाज्या या विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले होते.
यासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्वला बावके यांनी लगेचच नाशिक पंचायत समितीच्या आवारात उमेदच्या वतीने बचत गटांतील महिलांसाठी विक्रीसाठीचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले, यावरच न थांबता उमेदच्या वतीने या बचत गटातील महिलांनी आणलेल्या रानभाज्यांची संपूर्ण विक्री होण्यासाठी प्रचार प्रसिद्धी देखील करण्यात आली होती, बहुतेक शहरी भागातील नागरिकांना रानभाज्या या कशा बनवाव्यात याबद्दल माहिती नसते त्यासाठी पुढील काळात पंचायत समिती नाशिकच्या घरकुल योजनेतील ‘डेमो हाऊस’ मध्ये तयार रानभाज्या या विकल्या जाणार आहेत, त्याचबरोबर या रानभाज्या नेमक्या बनवाव्या कशा यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर पाककृतीचे व्हिडिओ देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे, क्यू आर कोड स्कॅन करून सहजरीत्या हे व्हिडिओ नागरिकांना पाहता येणार आहेत.
पुढील काळात प्रत्येक आदिवासी तालुक्यातील बचत गट व वैयक्तिक विक्रेते यांना या आठवडी रानभाज्या महोत्सवात सहभागी करुन घेतले जाणार असल्याचे उमेद प्रकल्प संचालक उज्वला बावके यांनी सांगितले.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/