दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरणं पोलीस निरीक्षकाला भोवलं
पुणे : दुचाकीस्वाराला बाईकसकट उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरणं पोलीस निरीक्षकाला भोवल्याचं दिसत आहे. गेल्या आठवड्यात पुण्यातील समर्थ वाहतूक पोलिस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला त्याच्या दुचाकीसह टोईंग व्हॅनमध्ये उचलून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. गुरुवार 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. सोशल मीडियावर याचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांवर जोरदार टीका झाली होती. वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांची वाहतूक शाखेतून बदली करण्यात आली आहे.
राजेश पुराणिक यांची वाहतूक शाखेतून थेट विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. प्रशासन विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी यासंबंधी आदेश दिले आहेत. ज्या पद्धतीने पोलिसांनी ही कारवाई केली आहे, त्याबद्दल पुणेकरांकडून संताप व्यक्त केला गेला. वाहनचालक जरी चुकत असेल, तरी अशा पद्धतीने वाहतूक पोलिसाने कारवाई करणं, कितपत योग्य आहे? दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि त्याला मार लागला असता, तर याला कोण जबाबदार राहिलं असतं? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित झाला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे काय कारवाई करणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यानंतर आठवड्याभरातच त्यांची बदली केल्याचं समोर आलं आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/