काँग्रेसच्या नेत्यांचं ट्विटर अकाउंट लॉक करण्याबाबत ट्विटरनं दिलं स्पष्टीकरण!
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट गेल्या आठवड्यात ट्विटरकडून लॉक केलं होतं. त्यानंतर गुरुवारी सकाळी ट्विटरनं काँग्रेसच्या अजून काही नेतेमंडळींची अकाऊंट्स लॉक केल्यानंतर आता थेट काँग्रेस पक्षाचंच मुख्य अकाऊंट ट्विटर इंडियानं लॉक केलं आहे. दरम्यान, ट्विटर इंडिया मोदी सरकारच्या दबावाखाली हे काम करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरनं स्पष्टीकरण दिलं आहे.
नियमांचे उल्लंघन करत फोटो पोस्ट केल्यामुळे अकाऊंट लॉक केल्याचे ट्विटरने सांगितले. ट्विटरच्या मते, ही कारवाई गोपनीयता आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानीत गेल्या आठवड्यात ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाची छायाचित्रे पोस्ट केल्यामुळे ट्विटरने राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांची खाती लॉक केली आहेत.
काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर खाते लॉक केल्या संदर्भात ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीचे नियम प्रत्येकाला निष्पक्षपणे लागू केले जातात. आमच्या नियमांचे उल्लंघन करत पोस्ट करणाऱ्या अंदाजे शंभर ट्वीट्सवर आम्ही सक्रिय कारवाई केली आहे. या प्रकारची काही वैयक्तिक माहिती इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त धोका निर्माण करते. व्यक्तींची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्याचे आमचे ध्येय आहे.
तसेच, ट्विटर प्रत्येकाला ट्विटर नियमांशी परिचित होण्यासाठी आणि त्यांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही गोष्टीची तक्रार करण्यास प्रोत्साहित करते. ट्विटरच्या मते, जर एखादे ट्विट त्याच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आणि वापरकर्त्याने ते काढले नाही, तर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ते एका नोटिसीच्या मागे लपवते. यासोबतच, जोपर्यंत ते ट्विट काढून काढुन टाकत नाही तोपर्यंच ट्विटर खाते ब्लॉक राहते.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/