Tokyo Olympics 2020: भारतीय महिला संघाचा हॉकी स्पर्धेत ग्रेट ब्रिटनकडून पराभव

Connect With Us

tokyo2020 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाला हॉकी स्पर्धेत ग्रेट ब्रिटनकडून पराभव झाला आहे. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोलशून्य बरोबरीनंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये तब्बल पाच गोल झाले. ब्रिटनने १-० ची आघाडी बऱ्याच काळ टीकवली होती. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये सामन्यात चार गोल्स झाले. यापैकी ब्रिटनने एक गोल केला. तर भारताने अवघ्या नऊ मिनिटांमध्ये तीन गोल करत हाफ टाइममध्ये ३-२ ची आघाडी मिळवली. ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टर्समध्ये ३-३ ची बरोबर केल्याने अंतीम १५ मिनिटं महत्वाची ठरली. शेवटच्या १५ मिनिटांनंतर सामन्याचे अंतिम स्कोअरकार्ड ४-३ असं होतं.

सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटनच्या संघाने आक्रमक खेळ केला. यादरम्यान, ब्रिटीश संघाला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले. मात्र भारतीय गोलरक्षक सविता पुनिया आणि बचाव फळीने भक्कम बचाव करत ब्रिटीश आक्रमणाला थोपवून धरले. त्यामुळे पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस गोलफलक ०-० अशा बरोबरीत राहिला.

मात्र दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच ब्रिटिश खेळाडूंनी भारतीय बचावफळी भेदत जोरदार मुसंडी मारली. दुसऱ्या क्वार्टरमधील पहिल्याच मिनिटाला एलेना रायरने गोल करत ग्रेट ब्रिटनने गोल करून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर सारा रॉबर्टसनने केलेल्या गोलच्या जोरावर ब्रिटनने आपली आघाडी २-० अशी वाढवली. मात्र ०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिला संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. गुरजित कौरने भारताला मिळालेल्या दोन पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल करत भारताची पिछाडी भरून काढत संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर मध्यांतराला काही वेळ बाकी असताना २९ व्या मिनिटाला वंदना कटारियाने ब्रिटनचा बचाव भेदत गोल केला आणि भारताला ३-२ ने आघाडी मिळवून दिली.

मध्यांतरानंतरच्या खेळात ग्रेट ब्रिटनने पुन्हा एकदा जोरदार आक्रमण केले आणि सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर संपूर्ण क्वार्टरवर ब्रिटनच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. दरम्यान, तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या काही सेकंदात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्याचा भारताला फायदा घेता आला नाही. त्यानंतर चौथ्या आणि निर्णायक क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी आक्रमणाची धार वाढवत भारतावर दबाव आणला आणि सामन्यातील ४८ व्या मिनिटाला गोल करून ग्रेट ब्रिटनने सामन्यातर ४-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत ब्रिटनने सामन्यावर आणि टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदकावर कब्जा केला.

आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7


Connect With Us