राज्य सरकारचा मोठा निर्णय; पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही
मुंबई : काल मंगळवारी (3 ऑगस्ट) रोजी दुपारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा परीक्षेचा निकाल लागला. राज्याचा सरासरी निकाल ९९.63 टक्के इतका लागला. त्यामुळे आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार? अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती.
मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान, कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला आहे. बारावीचा बोर्डाचा जो निकाल लागला आहे, त्याच्या आधारावरच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. तुकड्यांची किंवा विद्यार्थ्यांच्या संख्येची आवश्यकता असेल, तर ३१ तारखेआधी आमच्याकडे त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावेत. पण एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी विद्यापीठानं घ्यायला हवी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत”, अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7