चिंताजनक : देशात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित महाराष्ट्रात !
मुंबई : कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंटने आता देशासह राज्यभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे’. त्यामुळं सर्वांचीच चिंता वाढली आहे. दरम्यान, ओमायक्रॉन विषाणूने सोमवारी मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे.
दक्षिण आफ्रिकेतून २५ नोव्हेंबरला मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रवासी करोनाबाधित असल्याचे २९ नोव्हेंबरला आढळले होते. त्यामुळे त्याचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले होते. त्यात त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेतला असता त्याच्याबरोबर राहिलेल्या ३६ वर्षीय मैत्रिणीलाही करोनाची लागण झाल्याचे ३० नोव्हेंबरला आढळले होते. ही महिला २५ नोव्हेंबरला अमेरिकेतून मुंबईत आली होती. तिलाही ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे जनुकीय कर्मनिर्धारणादरम्यान स्पष्ट झाले.