तालिबानचा अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी पहिला आदेश !
दहशतवादी संघटना तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला. दोन दशकांनंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आली आहे. देशातील परिस्थिती बिघडत चालली असून लाखो लोक देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान आता, तालिबानचा अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी पहिला आदेश आला आहे. रविवारी रात्री राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने मंगळवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्यासाठी सांगितले आहे. तालिबानने कर्मचाऱ्यांना ‘माफी’ दिली आहे. अशा स्थितीत आपण पूर्ण विश्वासाने आपली दिनचर्या सुरू करू शकता, असे तालिबानने म्हटले आहे.
अमेरिका आणि नाटोच्या फौजा तब्बल २० वर्षांच्या मुक्कामानंतर अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्या. त्यानंतर तालिबाननं अख्खा अफगाणिस्तानच आपल्या बंदुकीच्या दहशतीखाली आणला आहे. अनेक नागरीकांनी देश सोडला आहे. राष्ट्रपतींसह अनेक राजकीय नेते देशातून पळून गेले आहेत. दरम्यान, तालिबान्यांनी देशावर पूर्णपणे नियंत्रण ठेवले आहे.
काबूलमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण होते. काही नागरिक घरात लपून बसले होते. तालिबानने चौकांमध्ये सैनिक तैनात केले होते. काही ठिकाणी लुटालूट झाली. बंदूकधारी तालिबान्यांनी काही घरांचे दरवाजे ठोठावले. परंतु अशा प्रकारच्या घटना तुरळक प्रमाणात घडल्या. राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी उत्सव साजरा करत आहेत. तालिबानी अतिरेक्यांनी काबूलमधील राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. काबूलच्या रस्त्यावर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता काबीज केल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी भीतीग्रस्त लोकांचे लोंढे काबूल विमानतळावर दाखल झाल्याने सोमवारी सकाळी तेथे अभूतपूर्व अनागोंदी माजली. यावेळी झालेल्या रेटारेटीत सात जणांचा मृत्यू झाला. अमेरिकी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या लष्करी विमानात जबरदस्तीने चढताना खाली कोसळल्याने आणि विमानतळावर रेटारेटी झाल्याने मनुष्यहानी झाली.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/