नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का ! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दहा दिवसात शरण येण्याचे आदेश
मुंबई ; भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत नितेश राणेंना अटक करता येणार नाही. शरण आल्यानंतर नितेश राणे नियमित जामिनसाठी अर्ज करु शकतात.
नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला. त्यामुळे आता कनिष्ठ कोर्टात नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, नितेश राणेंवरील आरोप खोटे असून राजकीय सुडापोटी करण्यात आलेले हे आरोप असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याचा राणेंच्या वकिलांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांच्या समोर नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. नितेश राणे यांच्यावतीनं मुकूल रोहतगी तर राज्य सरकारच्यावतीनं अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. कोर्टात दोन्ही बाजूनं जोरादर युक्तिवाद करण्यात आला.
संतोष परब हल्ला प्रकरण –
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेतलं. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती.
“मतदारांवर दबाव आणण्यासाठी १८ तारखेला महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुखावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात फिर्यादीने नितेश राणेंचं नाव घेतलं होतं. पोलीस तपासात नितेश राणे दोषी आढळल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे. दोषी असतील तर त्यांना अटक होईल. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या मंत्रीपदाचा फायदा घेत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/