KBCमध्ये भाग घेणं रेल्वे अधिकाऱ्याला पडलं महागात,तीन वर्षांसाठी रोखली वेतनवाढ
मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला छोट्या पडद्यावरील शो ‘कौन बनेगा करोडपती १३’ सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये काही दिवसांपूर्वी हॉट सीटवर रेल्वे अधिकारी देशबंधू पांडे बसले होते. शो मध्ये ते सहभागी झाल्यानंतर अतिशय आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. पण त्यांना घरी गेल्यानंतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. राजस्थानच्या कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक विभागाचे कार्यालय अधीक्षक म्हणून तैनात असलेल्या देशबंधू पांडे यांना रेल्वे प्रशासनाने चार्जशीट दिली असून त्यांच्या वेतनवाढीवर तीन वर्षांसाठी बंदीही घातली आहे.
‘कौन बनेगा करोडपती 13’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये राजस्थानच्या कोटा येथे राहणारे रेल्वे अधिकारी देशबंधू पांडे ) सहभागी झाले होते. शोमध्ये पांडे यांनी 3 लाख 40 हजार रुपये जिंकले. मात्र ही रक्कम जिंकण्यापेक्षा या शोच्या निमित्तानं आपल्याला अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट-सीटवर बसून हा खेळ खेळता आला, याचा आनंद त्यांना झाला होता. अनेक वर्षांपासूनचे आपले स्वप्न पूर्ण झाल्यानं ते आनंदी होते. पण त्यांचा हा आनंद काहीच काळ टिकला. कोटा येथे परतत नाही तोच रेल्वे प्रशासनाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून कोणतीही माहिती न देता गायब होणे आणि केबीसीमध्ये सहभागी होत असल्याची पूर्व माहिती दिली नसल्याचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, देशबंधू हे रजा मंजूर झाल्याशिवाय ९ ते १३ ऑगस्टपर्यंत बेपत्ता होते आणि त्यांचे असे वागणे कामाकडे दुर्लक्ष करण्यासारखे असल्याचे चार्जशीटमध्ये म्हटले आहे.
या प्रकरणी देशबंधू पांडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते त्यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवशी केबीसीमध्ये पोहोचले होते. रेल्वे प्रशासनाद्वारे केल्या जाणाऱ्या या कारवाईला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. पश्चिम मध्य रेल्वे मजदूर संघाचे विभागीय सचिव खालिद यांनी म्हटले आहे की, रेल्वे प्रशासन पांडे यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे आणि त्यांच्याविरोधात खटला लढला जाईल.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/