मुख्य मैदानावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; पडळकरांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पाडली पार!
सांगली : कायद्याने बंदी असल्याने कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा पोलिस प्रशासनाने घेतला होता. मात्र कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत पार पडणारच, असा निर्धारच पडळकरांनी केला होता. गेल्या तीन ते चार दिवसांपासून झरे गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. झरे गावच्या पंचक्रोशीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तसंच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याही मागे पोलिस असतानाही पडळकर यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे.
झरे गावात बैलगाडा शर्यत पार पडणार होती. मात्र पोलिसांनी गावच्या मुख्य मैदानाची धावपट्टीच उखडून टाकली होती. त्यानंतर मात्र पडळकर समर्थकांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास तिथूनच पाच किमी अंतरावर दुसऱ्या एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली.
या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. तसंच ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्ताने पडळकर समर्थकांनी पोलिस आणि प्रशासनाला मोठा गुंगारा दिल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांना गाफील ठेऊन ही शर्यत पार पडली. पडळकर समर्थकांची बैलगाडा शर्यत पार पडणार की नाही, याची राज्यभरात मोठी उत्सुकता होती. अखेर पडळकर समर्थकांनी स्पर्धेचं यशस्वीपणे आयोजन केलेलं आहे. स्पर्धेनंतर समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
पडळकर यांची प्रतिक्रिया
“काही शेतकऱ्यांनी, बैलगाडा चालक मालकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली असल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमांतून कळत आहे. आम्ही आणखी त्या ठिकाणी गेलेलो नाही. झरे गावात मोठा पोलिस फौजफाटा होता. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला. पण आता आम्हाला काही शेतकऱ्यांनी स्पर्धा पार पाडली आहे, अशी माहिती कळतीय”
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/