चिंताजनक ! केरळमध्ये निपाह व्हायरसने १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
करोनानंतर केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. केरळच्या कोझीकोड जिल्ह्यात ३ सप्टेंबर रोजी एका १२ वर्षाच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, या मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे. बाधित मुलाच्या शरीरातून नमुने घेण्यात आले होते. जे पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था (NIV) येथे पाठवण्यात आले. त्यानंतर मुलाला निपाह विषाणूची व्हायरसची लागण झाल्याते स्पष्ट झाले होते.
आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं निपाह विषाणूचा संशयित रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच शनिवारी रात्री उशिरा आरोग्य अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.
केंद्र सरकारकडून देखील याची पुष्टी झाली असून केंद्राचंही आरोग्य पथक केरळला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. निपाह विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशी सर्व मदत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला करण्यात येईल असं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.
“आम्ही सध्या काही टीम्स तयार केल्या असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर आवश्यक उपाययोजना आधीच सुरु करण्यात आलेल्या आहेत. चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकार पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे”, असं केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं.
ज्या १२ वर्षीय मुलाला निपाह व्हायरसची लागण झाली. त्याच्या संपर्कात असलेले कुटुंबीय आणि इतर व्यक्तींमध्ये निपाहची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच तातडीनं कोझिकोडकडे रवाना होत असल्याचंही जॉर्ज यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, केरळमध्ये निपाह व्हायरस रोगाचा पहिला रुग्ण १९ मे २०१८ रोजी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात आढळला होता. १ जून २०१८ पर्यंत राज्यात १८ रुग्ण आढळले होते. तर या संसर्गामुळे १७ जणांचा मृत्यू झाला होता. जेव्हा निपाह विषाणूने प्रथम केरळमध्ये थैमान घातले तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरा केरळकडे होत्या.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/