…पण मी माझ्या आदेशावर ठाम; फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर नाशिक पोलीस आयुक्तांची स्पष्टता !

Connect With Us

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर  राणेंविरोधात दाखल गुन्ह्यासंदर्भात त्यांना अटक करण्यासाठी आमची टीम रत्नागिरीत दाखल झाली होती. पण महाडमध्येही त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद असल्यानं महाड पोलिसांनी त्यांना अटक केली होती. रात्री उशिरा त्यांना महाड कोर्टानं जामीन मंजुर केला आहे. पण आता नाशिक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे राणेंना पुन्हा अटक केली जाणार असल्याची चर्चा होती. पण याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राणेंना आता पुन्हा अटक करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

रात्री उशिरा त्यांना महाड कोर्टानं जामीन मंजुर केला आहे. यात मंत्री महोदयांनी घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं लेखी दिलं आहे. त्यामुळे त्यांना आता पुन्हा अटक करण्याची गरज नाही. आम्ही अटकेच्या आदेशात बदल करुन त्यांना फक्त जबाब नोंदविण्यासाठी २ सप्टेंबरपर्यंत नाशिक पोलीस ठाण्यात हजर राहावं लागणार आहे. यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं आणि राणेंनीही सहकार्य करण्यास तयारी दाखवली आहे. मंत्री महोदयांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचं आम्ही स्वागत करतो”, असं नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत नाशिकचे पोलीस आयुक्त काय छत्रपती आहेत का? असा सवाल उपस्थित करत दीपक पांडे यांनी जारी केलेल्या अटकेच्या आदेशावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं होतं. याबाबत दीपक पांडे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी अटकेचे आदेश कायद्यानुसारच देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

“राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना समाजकारणाचा चांगला अनुभव आहे. ते खूप जाणकार नेते आहेत. त्यांना कायद्याचंही चांगलं ज्ञान आहे. त्यांना आव्हान देण्याची वगैरे भूमिका नाही. पण आम्ही जारी केलेले आदेश त्यांना घटनाबाह्य वाटत असतील तर ते त्याविरोधात भारतीय घटनेच्या तरतुदीनुसार यावर माहिती जाणून घेऊ शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. पण माझ्या मतानुसार मी जारी केलेल्या आदेशावर ठाम असून अटकेचे आदेश कायद्यानुसार आणि पूर्णपणे योग्य होते. त्यात राणेंनी आता घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं लेखी दिल्यानं अटक करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे आम्ही अटकेच्या आदेशात बदल केले आहेत”, असं दीपक पांडे म्हणाले.


Connect With Us