मुंबई ; गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर
नवी मुंबई : ;गणेशोत्सव जवळ आला आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने नियमावली जारी केली आहे.नियमावलीनुसार गणेशोत्सव मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन ई-सेवा संगणक प्रणालीद्वारे 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. मंडप उभारणी परवानगी अर्ज वरील नमूद कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे http://www.rtsnmmconline.com या वेबसाईटवर ऑनलाईन सादर करण्यात यावेत.
तसेच लेखी परवानगी प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी करु नये. उत्सव सुरु होण्याच्या 10 दिवस अगोदर कोणतेही परवानगी अर्ज विभाग कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत किंवा मंडप उभारणेसाठी परवानगी दिली जाणार नाही याची नोंद घेऊन सर्व गणेशोत्सव / नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणाऱ्या मंडळानी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे
नियमावली पुढीलप्रमाणे :
1) सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
2) यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरीता 4 फूट आणि घरगुती गणपती 2 फूटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीं ऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे.
3) कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
4) मुर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरीता वर्गणी किंवा देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.
5) जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
6) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.
7) लागू करण्यात आलेले Breaking the Chain याबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. आरती, भजन, कीर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.
8) श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजीकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
9) श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील / इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.
10) महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैदयकिय शिक्षण विभाग तसेच संबधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/