दहीहंडी फोडल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : कोणत्याही परिस्थितीत दहीहंडी उत्सव साजरा करणारच असा आक्रमक पवित्रा घेत, मनसे नेते बाळा नांदगावकर हे काळाचौकी मैदानात आले. या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असून मैदानात मनसे सैनिक मोठ्या प्रमाणावर जमले होते. तर, पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्हाला उत्सव साजरा करू द्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
करोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजपा आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतरही मुंबई, नाशिक आणि ठाण्यात आज काही ठिकाणी हा मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी मंडळांची बैठक घेत करोनामुळे दहीहंडी साजरी न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या निर्बंधांचा निषेध म्हणून नाशिक , ठाणे आणि मुंबईत अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दहीहंडी उभारली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांचे नियम धुडकावून दहीहंडी फोडत मनसेचा झेंडा फडकवला.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/