Indian Idol 12: फायनलिस्ट सायली कांबळेला शो संपताच मिळाला मोठा ‘ब्रेक’
इंडियन आयडॉल ‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12 Finale ) या देशातील सर्वात लोकप्रिय शोचा विजेता कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच पवनदीप राजन हा ‘इंडियन आयडल 12’ चा विजेता ठरला. तर अरूणिता कांजीलाल ही उपविजेती ठरली. पवनदीप राजन व अरूणिता हे दोघेही शोच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. तसेच इंडियन आयडॉलच्या बारावा शो मधील आपल्या सुरेल स्वरांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गायिका सायलीला इंडियन आयडॉल शो संपताच मोठा ब्रेक मिळाला आहे. फिल्ममेकर जो राजन दिग्दर्शित ‘कोल्हापूर डायरीज’ या चित्रपटासाठी सायलीने नुकतेच गाणे गायले आहे.
जो राजन दिग्दर्शित कोल्हापूर डायरीजच्या या गाण्याला अवधूत गुप्तेनी संगीत दिले आहे. स्वप्नील बांदोडकर आणि सायली कांबळे यांनी हे रोमँटिक गाणे गायले आहे. हे गाणे लवकरच गायत्री दातार आणि भूषण पाटील यांंच्यावर चित्रीत होणार आहे.
फिल्ममेकर जो राजन म्हणाले, सायलीच्या गळ्यात जादु आहे. तिचा इंडियन आयडॉलचा संगीत प्रवास मी गेले कित्येक महिने पाहिला आहे. त्यामुळेच मला तिचा अभिमान आहे. या महाराष्ट्राच्या लाडक्या मुलीला मराठी सिनेमासाठी ब्रेक देताना मला खूप आनंद होतो आहे.
संगीतकार, गायक, फिल्ममेकर अवधूत गुप्ते म्हणतात, आमचे दिग्दर्शक जो राजन यांना सायलीचा आवाज खूप आवडला होता. त्यामुळे त्यांनीच मला सायलीचे नाव या गाण्यासाठी सुचवले. ती किती उत्तम गायिका आहे, ते ती दरवेळी सिद्ध करते. सायलीच्या रूपाने एक टॅलेंटेड गायिका महाराष्ट्रालाच नाही तर अख्या जगाला मिळालीय, असे मला वाटते.
याबाबत सायली कांबळे म्हणते, “मला विश्वासच बसत नाही की माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. इंडियन आयडॉलमध्ये जाण्याचे कारणच होते, लोकांनी मला ओळखावे आणि माझे संगीत क्षेत्रातील करीयर सुरू व्हावे. इंडियन आयडॉलचा ग्रँड फिनाले झाल्याझाल्या हातात काम मिळणे, हे भाग्याचे आहे. लहानपणापासून अवधूत गुप्तेंची मी चाहती आहे आणि त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक जो राजन यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे.”
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/