रुग्णालयात होणार्‍या आगीच्या घटनांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

Connect With Us

मुंबई : करोना काळात एकीकडे कोरोनाचे संकट गडद असतानाच त्याच कालावधीत राज्यभरातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या अनेक दुर्घटना घडल्या.दुर्दैवाने या दुर्घटनांमध्ये अनेकांना जीव देखील गमवावा लागले. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, त्यानुसार या पुढील काळात अशा प्रकराच्या दुर्घटनांची जबाबदारी आता संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक देखील जारी केले आहे.

करोना काळात शासकीय व खासगी रुग्णालयांवर बराच ताण होता. त्याचप्रमाणे वीज उपकरणांची निगा व देखभाल योग्यरितीने न राखल्याने या अनुचित घटना घडल्या आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयातील वीज पुरवठा योग्य राहावा, रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या जीवन सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य राहावे, या उद्देशाने राज्य सरकारने हे निर्देश जारी केले असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांना प्राण गमवावे लागले. या ठिकाणी आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात असल्याने रुग्णालयातील वीज पुरवठ्याच्या संदर्भात अधिक काळजी व उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य सरकारने शासकीय व खासगी रुग्णालयांच्या संचालकांना दिलेले आहेत.

तसेच, कोविड काळात रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळीत ठेवणे, जनित्र संच तसेच इन्व्हर्टरच्या माध्यमातून अंतर्गत वीज पुरवठा उपलब्ध करणे, ऑपरेशन थिएटर, आयसीयू येथील वातानुकूलित यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विद्युत उपकरणांची निगा व देखभाल योग्यरितीने करण्याच्या संदर्भात रुग्णालयांना शासनाने दिशानिर्देश दिलेले आहेत.

 


Connect With Us