उद्यापासून नाशकात नवीन नियमावलीची अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नाशिक : राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील 11 जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आता आस्थापनं रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर शनिवारी आस्थापनं दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रविवारी मात्र निर्भंध कायम असणार आहेत. शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी उद्यापासून नाशिक जिल्ह्यात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.
यानुसार सलून, ब्युटी पार्लर, स्पा, जिम हे रात्री आठवाजेपर्यंत सुरू असणार आहे. मात्र यासाठी ५० टक्के क्षमतेची मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी असणार आहे. तर, रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. धार्मिकस्थळ उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. राज्यभरात धार्मकस्थळे ही बंदच असणार आहे.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे व मल्टिप्लेक्सदेखील पुढील आदेशापर्यंत बंदच असणार आहेत. कृषी, औद्योगिक, नागरी, दळणवळणाची कामे पूर्ण क्षमतेने करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
तसेच, सरकारी आणि खासगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. याशिवाय जी कार्यालये वर्क फ्रॉम होम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी, असेदेखील सांगण्यात आले.