नारायण राणेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १७ सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश
मुंबई : मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी नारायण राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नारायण राणेंच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाकडून एक मोठा दिलासा मिळाला आहे. आज नारायण राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दुपारी सुनावणी पार पडली आहे. सुनावणीदरम्यान १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची आदेश हायकोर्टाने दिले असून राज्य सरकारने देखील त्याबाबत हमी दिली आहे.
नारायण राणेंविरुद्ध राज्यात विविध ठिकाणी दाखल केलेल्या गुन्हे हे खोटे आहेत, असे राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले आहे. या गुन्हयांविरोधात ही याचिका हायकोर्टात करण्यात आली आहे. राणेंवर जिथे गुन्हे दाखल आहेत तिथे जाण्याची गरज नाही. नारायण राणे यांनी २३ ऑगस्टला केलेलं वक्तव्य प्रक्षोभक नव्हतं, असे देखील वकील मानेशिंदे पुढे म्हणाले.
विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी देखील राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडली. जोवर पुढची सुनावणी होत नाही तोवर कुठलंही विधान करू नये अशी मागणी देसाई यांनी केली. मात्र, राणेंचे वकील मानेशिंदे यांनी ही मागणी म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, असे कोर्टात सांगितले. त्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारची ही मागणी मान्य केली नाही. पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला घेण्यात येईल.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रे दरम्यान मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात नारायण राणेंच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये महाड, नाशिक, पुणे आणि ठाण्याचा समावेश आहे. मात्र, हे सर्व गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी करणाची याचिका नारायण राणेंनी हायकोर्टात केली होती आणि त्यावर आज सुनावणी झाली.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/