उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी निधन झाले.कल्याण सिंह हे चार जुलैपासून लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल होते. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांपासून कल्याण सिंह यांची प्रकृती अधिक चिंताजनक बनली होती.
कल्याण सिंह हे राजस्थानचे राज्यपाल देखील होते. याशिवाय, ते भाजपचे संस्थापक नेते होते. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून अनेक ज्येष्ठ नेते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोनवर कल्याणसिंह यांची तब्येत जाणून घेतली होती. कल्याण सिंह यांची तब्येत जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अनेक वेळा हॉस्पिटलला भेट दिली.
कल्याण सिंह यांचा जन्म ५ जानेवारी १९३२ रोजी झाला होता. ते १९९१ मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर १९९७-९९ या काळातही ते मुख्यमंत्री राहीले. उत्तर प्रदेशच्या राजकारणात हिंदुत्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. २००९ मध्ये त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. तर, २६ ऑगस्ट २०१४ मध्ये ते राजस्थानचे राज्यपाल बनले होते. १९९९ मध्ये भाजपा सोडल्यानंतर त्यांनी २००४ मध्ये पुन्हा भाजपा प्रवेश केला होता. यानंतर ते बुलंदशहर येथून भाजपाचे खासदार बनले, त्यानंतर २००९ मध्ये अपक्ष खासदार देखील बनले होते. २०१० मध्ये कल्याण सिंह यांनी आपली स्वतंत्र जन क्रांती पार्टी तयार केली. उत्तर प्रदेशच्या अतरौली विधानसभा मतदारसंघातून अनेकदा खासदार राहिलेले कल्याण सिंह यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.