यंदाही राज्य सरकारकडून दहीहंडीला परवानगी नाहीच !

Connect With Us

मुंबई ; दहीहंडी सण साजरा करू देण्यासाठी गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींची आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकांना जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन आपण सण, उत्सव काहीकाळ बाजूला ठेवू असं आवाहन करत दहीहंडीवर यंदाही निर्बंध असतील याबाबतचे संकेत दिले आहेत.

दहीहंडी  साजरी करण्यासाठी शासनानं परवानगी द्यावी नाहीतर आंदोलन करु असा इशारा दहीहंडी मंडळांच्या प्रतिनिधींनी घेतला आहे. त्यात भाजपानंही दहीहंडी सण कोरोना संबंधीचे नियम पाळून साजरा करू देण्यास परवानगी देण्यास हरकत नाही अशी भूमिका घेतली आहे.

त्यावर जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा, अशी संयमी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली.

तसेच, आपले सण आपण जपलेच पाहिजेत. पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करत आपण आरोग्याच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ, असं म्हणत उद्धव उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

“बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षीपासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची अवस्था आपण पाहायला हवी. लसीकरण झालेलं असतानाही काही देशांमध्ये लॉकडाऊन लावावं लागलं आहे. तर इस्रायलनं पुन्हा मास्क वापरायला सुरुवात केली आहे. आपण जर आता समजुतीनं घेतलं नाही आणि त्यानुसार वागलो नाही तर धोका अटळ आहे”, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींच्या  ५ मागण्या

१) आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी.
२) दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे.
३) गोविंदा पथक हे दुसरीकडे कोठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत.
४) कोविड १९ संसर्गाची जाणिव ठेवुनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी.
५) दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.


Connect With Us