अत्याचारग्रस्त महिलांना मानसिक आधार देण्यासाठी पुण्यात ‘रेप क्रायसिस सेंटर’ची स्थापना

Connect With Us

पुणे : देशाभरात महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. स्त्रियांना वेळोवेळी असुरक्षित वाटेल असे काही विकृत बुद्धीचे नराधम या समाजात असतात, म्हणून वेळोवेळी अशा घटना घडल्याचे ऐकायला मिळते.  बलात्कारासारखी गंभीर घटना घडल्यानंतर महिलांचं आयुष्य बदलून जातं. अनेक महिला स्वतःच अपराधीपणाची भावना घेऊन दबावात जगत राहतात. अशा महिलांच्या मनातली नकारात्मक भावना दूर करण्यासाठी, त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि कायदेविषयक मदत करण्यासाठी ‘सहयोग ट्रस्ट’तर्फे ‘रेप क्रायसिस सेंटर’ सुरू करण्यात आलं आहे.

बलात्कारासह जगणाऱ्यां महिलांना त्यांचे दुःख आणि समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून ‘सपोर्ट ग्रुप’ चालवण्यात येणार आहे. ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झालेले असतात अशा महिला जणू काही ती स्वतःचीच चूक आहे असा दबाव घेऊन आयुष्यभर जगत असतात. त्यामुळे त्यांच्या मनातला ताणतणाव एकमेकांसोबत संवादातून कमी करण्याचा प्रयत्न हा ‘सपोर्ट ग्रु’प करणार आहे. यासोबतच बलात्कारग्रस्त स्त्रिया आणि त्यांच्या मुलं आणि परिवारासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्याचं कामंही या संस्थेतर्फे केलं जाणार आहे.

‘मायग्रोथ झोन’ ही कंपनी ‘न्युरोलिंग्विस्टीक’ तंत्रज्ञानावर काम करते. त्यांच्यातर्फे प्रशिक्षित व्यक्तींच्या माध्यमातून बलात्कारग्रस्त स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी मोफत मदत केली जाणार आहे. ‘मायग्रोथ झोन’सोबत ‘सहयोग ट्रस्ट’ सहकार्याच्या भावनेतून बलात्कारग्रस्त स्त्रियांच्या मनात निर्माण होणारी नकारात्मक भावना, आपल्या हातून पाप घडले, आपलीच चूक झाली अशी स्वतःलाच दोष देणारी भावना, मनातली भीती, राग यासंदर्भात वागणुकीत बदल घडवून आणण्यासाठी काम करणार आहे.

दरम्यान, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये देशात 32 हजार 559 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. या आकडेवारीनुसार दिवसाला देशात सरासरी 82 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. राज्यात 2019 मध्ये 2299 बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/

 

 


Connect With Us