भाजपाच्या ‘त्या’ १२ निलंबित आमदारांना दिलासा !

Connect With Us

मुंबई : राज्यात विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला होता. इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशनावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. निलंबनाच्या निषेधार्थ भाजपाने कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला होता दरम्यान, या भाजपाच्या निलंबित १२ आमदारांना  निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे.

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राज्यात पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती. ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, या पोटनिवडणूकीत भाजपाचे निलंबित बारा आमदार देखील मतदान करु शकणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळ प्रशासनाला भाजपाच्या निलंबित बारा सदस्यांसाठी मुंबईतील विधान भवनाच्या परिसराबाहेर मतदानासाठी स्वतंत्र बूथ स्टेशनची तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, निलंबित असल्यामुळे १२ आमदार विधान भवनाच्या परिसरात येऊ शकत नाही. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूकीत मतदान करण्यासाठी त्यांची वेगळी व्यवस्था सरकारला करावी लागणार आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us