पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, ‘या’ दिवशी होणार परीक्षा
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं. मात्र, कोरोनामुळं परीक्षा पुढे ढकलली होती.ही परीक्षा 25 एप्रिल रोजी होणार होती, मात्र पुन्हा एकदा या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा आता 23 मे रोजी होईल. राज्य परीक्षा परिषदेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 25 एप्रिल दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्यानं शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे.