घरात घुसून दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील घटना
नाशिक : नाशिकच्या मखमलाबाद परिसरात शिंदेनगर येथे इमारतीतील घर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यात दोन महिला गंभीर भाजल्या आहेत. या घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
पंचवटीतील मखमलाबाद रस्त्यावरील शिंदे नगर येथील भाविक बिलाजियो या इमारतीमध्ये प्रदीप ओमप्रकाश गौड हे आपले आई, वडील, पत्नी भाऊ, भावजयी, मुले आणि पुतण्यासह एका सदनिकेत राहतात. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरी मावशी भारती गौड आल्या होत्या. त्यांनतर दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या परिचयातील रिक्षाचालक कुमावत हा पेट्रोलच्या बाटल्या घेऊन घरात शिरला. त्याने भारती गौड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सोबत आणलेल्या बाटल्यांमधील पेट्रोल घरात टाकून आग लावून तो पसार झाला.आगीत घरातील बरेचसे साहित्य जळून खाक झाले.
सुदैवाने या घटनेत वयोवृद्ध व्यक्ती आणि तीन वर्षांचा चिराग पार्थच्या प्रसंगावधानाने वाचला. इमारतीच्या सदनिकेला लागलेली आग पाहून, अन्य नागरिकांनी अग्निशमन दलास माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेचे नेमके कारण काय, याचा पोलीस शोध घेत आहेत.
यावेळी घरात प्रदीप गौड यांची आई सुशीला गौड (६५), आजोबा जानकीदास गौड (८५), पार्थ गौड (१५), चिराग गौड (३), मावशी भारती गौड (५५) हे होते. या घटनेत भारती गौड गंभीररीत्या भाजल्या असून, त्यांची बहीण सुशीला गौड या देखील आगीत जखमी झाल्या आहेत.
या घटनेनंतर आरोपी सुखदेव कुमावत याला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर जीवे मारण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/