ब्रेक दि चेन नवे आदेश जारी, जाणून घ्या काय आहे नियमावली
मुंबई : राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत तर, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत. राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे.
या नियमावलीनुसार जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे रात्री आठवाजेपर्यंत सुरू असणार आहे. मात्र यासाठी ५० टक्के क्षमतेची मर्यादा घालण्यात आली आहे. शिवाय,वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी असणार आहे. तर, रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील. तर, धार्मिकस्थळ उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून, राज्यभरात धार्मिकस्थळं ही बंदच असणार आहे.
तसेच, सरकारी आणि खासगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेनं चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. याचबरोबर, जी कार्यालयं वर्क फ्रॉम होम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी, असेही सांगितले गेले आहे.
दरम्यान, राज्यातील निर्बंध कायम असणाऱ्या ११ जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत.