भाजपची मोठी घोषणा, रविंद्र चव्हाण यांच्याकडे महत्त्वाचे पद, वाचा सविस्तर
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून राजकीय वर्तुळातील घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. दरम्यान , भाजप पक्षाच्या शिर्डीतील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठी घोषणा केली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे रविंद्र चव्हाण यांची तुर्तास कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे भाजप अध्यक्षपदाची नेमणूक अजून काही दिवस लांबणीवर पडलेली आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत बावनकुळे पदावर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रविंद्र चव्हाण हेच पुढील भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील, असे सांगितले जात होते. शिर्डीतील अधिवेशनात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल, असेही बोलले जात होते. मात्र तूर्तास त्यांच्याकडे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मार्चमध्ये भाजपाध्यक्षपदाची निवड होणार असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान , भाजप पक्षसंघटनेत यापूर्वी कार्यकारी अध्यक्षपद असे पद अस्तित्वात नव्हते. रविंद्र चव्हाण यांना याआधी संघटनात्मक बांधणीचे काम देऊन संघटन प्रभारी केले होते. यानंतर आता कार्यकारी अध्यक्षपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडेपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार असल्याची माहिती आहे.