करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीने भारत विरुद्ध इंग्लंड पाचवी कसोटी रद्द

Connect With Us

IND VS ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिलीय. भारतीय संघातील भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी  पॉझिटिव्ह आल्यामुळे खेळाडूंनाही करोना संसर्गाचा धोका असल्याने कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या कसोटीसंदर्भात गुरुवारी आणि शुक्रवारी सविस्तर चर्चा करुन सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. दोन्हीकडील अधिकाऱ्यांमध्ये सामन्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर सामन्याला अगदी काही तास शिल्लक असताना केलेल्या चर्चेनंतर करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो या भीतीने सामना रद्द करण्यात आलाय. यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांकडून क्रिकेट चाहते आणि सामन्याशी संबंधित इतर सहकाऱ्यांची माफीही मागण्यात आलीय.

भारतीय संघामधील सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती असल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे असं ईसीबीने स्पष्ट केलंय. भारतीय संघ मैदानामध्ये उतरु शकत नाही असा उल्लेखही ईसीबीच्या अधिकृत पत्रकामध्ये आहे. तसेच सामना रद्द झाला असला तरी मालिका बरोबरीमध्ये सुटणार की भारताकडे चषक दिला जाणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

दरम्यान, सर्वात आधी चौथी कसोटी सुरु असताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे खेळाडूंचे बायो-बबलचे नियम आणखी कडक करुन ट्रेनिंग सेशनही रद्द करण्यात आलं. विशेष म्हणजे खेळाडूंना हॉटेल रुमबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पाचवी टेस्ट खेळवण्याबाबतही शंका व्यक्त केली जात होती. अखेर आज होणारी पाचवी कसोटी रद्द करण्यात आली आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा  

https://chat.whatsapp.com/JKGqgwJit2oHn7vZRZLD0M

आमच्या  फेसबूक पेज ला  फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 
https://m.facebook.com/106619358294186/


Connect With Us