IRCTC: रेल्वेत खानपान व इतर सेवा बंद, भाडे मात्र वाढीव
नवी दिल्ली :काेराेना महामारीमुळे झालेल्या कडक लॉकडाऊन नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले. त्याचबरोबर मर्यादित स्वरुपात प्रवासी रेल्वे गाड्यांना परवानगी देण्यात आली. मात्र, त्यात मिळणाऱ्या सुविधा आणि वाढीव प्रवास भाड्यामुळे प्रवासी वैतागले आहेत. या गाड्यांमध्ये काही सुविधा बंद करण्यात आल्या. काेराेनाचे कारण सांगून खानपान सेवा, एसी डब्यांमध्ये ब्लॅंकेट आणि उशी पुरविणे बंद करण्यात आले. पाकीटबंद अन्न पुरविण्यात येते. मात्र, त्याचा दर्जा अतिशय खराब असताे.
या गाड्यांसाठी तिकीटदरदेखील जास्त आकारण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रवासभाड्यातील सर्व सवलती रेल्वेने रद्द केल्या. त्यात ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलतही बंद झाली. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्येष्ठांना वाढीव प्रवासभाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.
आणखी एक बाब म्हणजे, दाेन ठराविक स्थानकांमध्ये वेगवेगळ्या गाड्यांसाठी वेगवेगळे प्रवासभाडे आकारण्यात येत आहे. या गाड्या डायनामिक प्रायसिंग असलेल्या दुरंताे, राजधानी किंवा इतर श्रेणीच्या गाड्यांमध्ये नाहीत. तरीही जास्त भाडे आकारण्यात येत आहे. भाडे सुपरफास्ट गाड्यांचे घेतात. मात्र, गाडी सर्वच ठिकाणी थांबते. अशा प्रकारावरून रेल्वेवर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रवासभाड्यात यापूर्वीच्या काळात ज्येष्ठ नागरिक महिलांना ५०, तर पुरुषांना ४० टक्के सवलत मिळते. त्यामुळे बाहेरगावी तीर्थयात्रा किंवा नातेवाईकांकडे जाणाऱ्या ज्येष्ठांना फार माेठा आधार मिळत हाेता. मात्र, रेल्वेने ही सवलत बंद केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक संतप्त झाले आहेत.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/