यंदा सलग दुसऱ्या वर्षीही श्रावणात त्र्यंबकेश्वरचे मंदिर राहणार बंद !
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबक राजांचे मंदिर यंदाच्या श्रावणात देखील बंद असणार आहे. दर सोमवारी होणारी ब्रम्हगिरी प्रदक्षिणा देखील भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्र्यंबक राजांचे मंदिर हे श्रावण महिन्यात विशेष महत्व असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग मानले जाते. श्रावण महिन्यात भाविक ब्रम्हगिरी प्रदक्षिणा करत असतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा ही प्रदक्षिणा बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
त्र्यंबकेश्वरचे मंदिर बंद असले तरी श्रावण महिन्यात होणारी त्रिकाल पूजा ही मोजक्या पुजाऱ्यांच्या हस्ते होणार आहे. त्या पूजेमध्ये खंड पडू दिला जाणार नाही. उद्या सायंकाळी भगवान त्र्यंबक राजांच्या पादुकांना कुशावर्तमध्ये स्नान घालून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा होईल, असेही मंदिर प्रशासनाने कळवले आहे.
श्रावण महिन्यात शेकडो भाविक त्रंबक नगरीत दाखल होतात. देशाच्या वेगवेगळ्या भागातून भाविक या ठिकाणी येत असतात. भाविकांची गर्दी झाल्यास पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. हा संभाव्य धोका रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने कोरोना नियमवलीअंतर्गत लागू केलेले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच अनुषंगाने यंदा सलग दुसऱ्या वर्षी श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचे मंदिर प्रशासनाने ठरवले आहे. याच दृष्टिकोनातून भाविकांना आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, भाविकांना मंदिर परिसरात येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या रस्त्यांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच ब्रम्हगिरी प्रदक्षिणा मार्गावरही मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात आहेत.
आमच्या व्हाट्स ग्रुप ला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/