वर्गात शिट्टी वाजवल्याच्या कारणातून ४० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण !
हरियाणामध्ये ४० विद्यार्थ्यांना शिक्षकानी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ शिट्टी वाजवल्याच्या कारणावरून ही अमानुष मारहाण केली असल्याची माहिती आहे. या घटनेत १० विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर याप्रकरणी मुलांच्या पालकांकडून शिक्षकांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना भागातील एका सरकारी शाळेत सोमवारी सकाळी ही घटना घडली. ११ वाजताच्या दरम्यान, ११ वीतील काही विद्यार्थ्यांनी वर्गात शिट्टी वाजवली. शिट्टी कोणी वाजवली अशी विचारणा शिक्षकांनी केली असता कोणीच उत्तर दिले नाही. सगळे शांत बसल्याचं पाहून संतापलेल्या शिक्षकांनी वर्गातील तब्बल ४० विद्यार्थ्यांना काठीने झोडपून काढले.
काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या संयुक्त तक्रारीनुसार, मांगे राम, रजनी आणि चरणजित सिंग या तीन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. चरणजीत सिंग नावाच्या शिक्षकाने अनुसूचित जातीच्या दोन विद्यार्थ्यांविरोधात जातीवाचक अपशब्द वापरल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच, या घटनेबद्दल मुलांनी पालकांना सांगितल्यास त्यांना रस्टिकेट करण्यात येईल, अशी धमकी चरणजीत सिंग या शिक्षकाने दिली, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच एका महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याच्या बनावट प्रकरणात अडकवून मुलांचे भविष्य उध्वस्त करण्याची धमकी दिली. या प्रकरणातील आरोपी शिक्षकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलांच्या पालकांनी पोलिसांकडे केली आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन होण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KELD8khS9K5Dqnj7BexDx7
आमच्या फेसबूक पेज ला फॉलो करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://m.facebook.com/106619358294186/